Nagraj Manjule Marathi Kavita
कवितांबद्दल –
मराठी कविता – माझी कविता
मराठी कविता – आईचे डोळे
मराठी कविता – आहे-नाही
या सर्व नागराज मंजुळे यांच्या कविता आहेत. या सर्व कविता उन्हाच्या कटाविरूध्द या नागराज मंजुळे यांच्या पुस्तकातून घेण्यात आल्या आहेत.
कवितांच्या माध्यमातून नागराज मंजुळे यांनी अप्रतिम रित्या गरिबीचे चटके अधोरेखित केले आहेत. त्याच्या या कविता म्हणजे त्यांनी अनुभवलेल्या खऱ्या आयुष्याचा आणि परिस्थितीचा खराखुरा नमुना आहेत.
मला आवडलेल्या नागराज मंजुळे यांच्या कविता या ब्लॉगमध्ये देण्यात आल्या आहेत. गरीबीचे चटके तसेच अंधाराकडून प्रकाशाकडे केलेले मार्गक्रमण त्याच्या या कवितांमधून उत्तम रित्या जाणवते.
माझी कविता
माझी कविता
फाटकी चोळी
ठिगळांच्या पदरानं दडवत
रणरणतं ऊन
खुरपणारी
बाभळीला झोके
घेत घेत
उपाशीपोटी झोपी गेलेली
माझी मलूल कविता
रोज एक स्वप्न
शिळ्या भाकरीसोबत तोंडी लावून
सुतकीचे घाव
दगडावर मारताना धपापणारी
माझी आशाळभूत कविता
‘बा’ ची वाट पाहून
रात्र पडते पोटात पाय घेऊन
पोरांसहित तेव्हा
भुकेजल्या चुलीसाठी काटे तोडताना
तळहातात मोडलेला काटा उपसून
मुक्यानंच टिपं गाळणारी
अश्राप माझी… सोशिक कविता
जिचे हात राबले आजन्म
जिनं रचले इमले दुसऱ्यांचेचं
स्व स्वप्नांच्या मढ्यावर
सौंर्द्याच्या इतिहासात
विरूपतेनं जिला गाडले गेले
इथल्या प्रत्येक घराच्या किल्ल्याच्या
आणि महालाच्या पायात
ताजमहालाच्या निर्मितीनंतर
जिचे कापले गेले हात
तीच अन्यायग्रस्त
माझी मजूर कविता
जी जन्मते
प्रश्न होऊन जीवघेणा
अन् निरूपायानं येते
चव्हाट्यावर
थांबून वाटेवर
तुम्हा इज्जतदारांना खुणावणारी
माझी बहिष्कृत
कविता
कवी – नागराज बाबूराव मंजुळे ( उन्हाच्या कटाविरूध्द)
आईचे डोळे
माझ्या आईने
या धावून येणाऱ्या
माथेफिरू अंधाराकडे
बघ किती त्वेषाने
रोखले आहेत
तिच्या विझूविझू डोळयांचे निखारे…
मी पाहिलंच नसतं
तिच्या डोळ्यांत तर
तर सखी
अजूनही तुझ्या घनकुतंलातच
अडकून पडले असते
माझे चंद्र तारे
कवी – नागराज बाबूराव मंजुळे ( उन्हाच्या कटाविरूध्द)
आहे-नाही
आहे-नाही होय-नकोच्या
झोक्यात झुलता त्राही
अंतरीचे उचंबळून काही
अधरांवर येता राही
किंचित थबकून भिडवून डोळे
मज वादळ आसक्तीने पाही
मी उधळूनी मग घरटे माझे
निघता निघता राही
कवी – नागराज बाबूराव मंजुळे ( उन्हाच्या कटाविरूध्द)
खूप छान कविता आहेत त्यांच्या