Mangesh Padgaonkar Sundar Marathi Kavita
mangesh padgaonkar marathi poem |
कवितेबद्दल-
मराठी कविता – पाखरांशी नातं असतं त्याचं गाणं
पाखरांनो, या मातीवर
सुखाने मी रांगत असतो,
तरीसुद्धा तुमच्याशी
माझं नातं सांगत असतो !
आभाळाच्या अपारात
तुम्ही उडत असता,
निळ्या निळ्या अथांगात
तुम्ही बुडत असता,
तेव्हा मी डोळे भरून
बघत असतो,
काही क्षण माझं स्वप्न
जगत असतो !
पाखरांनो, या मातीवर
सुखाने मी रांगत असतो,
तरीसुध्दा तुमच्याशी
माझं नातं सांगत असतो !
इथलं जिणं कधीचं मी
शाप मानलं नाही,
मातीवरचं प्रेम कधीच
पाप मानलं नाही !
मातीतच परमेश्वर
हिरवागार रूजून येतो ;
मातीच्या मार्दवातच
फुलांनी सजून येतो !
मातीवरुन वहाणारा
स्वर्गातसुध्दा वारा नसतो ;
आभाळाच्या करुणेला
मातीशिवाय थारा नसतो !
पाखरांनो, या मातीवर
सुखाने मी रांगत असतो,
तरीसुध्दा तुमच्याशी
माझं नातं सांगत असतो !
तुम्हांलाही मातीवरच
यावं लागतं,
आपलं अन्न इथेच बसून
खावं लागतं ;
मातीच्याच आधाराने
जगत असता, नांदत असता,
मातीवरच्याच काड्या जमवून
आपलं घरटं बांधत असता !
तुमच्या या पंखाना
मातीचा वास असतो,
आणि तरी निळ्याभोर
आभाळाचा ध्यास असतो !
मातीचं मातीपण कळण्यासाठी
आभाळावर प्रेम हे केलंच पाहिजे,
अस्तित्वाला तुमच्यासारखे पंख फुटून
निळ्या निळ्या अपारात गेलंच पाहिजे !
पाखरांनो, या मातीवर
सुखाने मी रांगत असतो,
तरीसुध्दा तुमच्याशी
माझं नातं सांगत असतो !
कवी – मंगेश पाडगावकर
माणंस अजून गाऊ शकतात
शीळ घालीत माणंस अजून गाऊ शकतात,
हातात हात गुंफून अजून जाऊ शकतात !
प्रत्येक वाट
गोंगाटाच्या रानात घुसते ;
मोटारींच्या आवाजांची
खिळेठोक कानांत असते !
असं असलं तरी माणंस
गाण्याला ताल अजून देऊ शकतात !
शीळ घालीत माणंस अजून गाऊ शकतात,
हातात हात गुंफून अजून जाऊ शकतात !
पुस्तकांच्या ओझ्याखाली
बाळपण सगळं चिरडून जातं ;
अक्राळविकराळ स्पर्धखाली
कोवळेपण भरडून जातं !
असं असलं तरी मुलं
फुगे घेऊन बागेत अजून धावू शकतात !
शीळ घालीत माणंस अजून गाऊ शकतात,
हातात हात गुंफून अजून जाऊ शकतात !
कटुतेचा पाऊस
घरं झोडून जातो ;
विश्वासाचा कणा
पार मोडून जातो !
तरी माणंस मायेने
बाळाचा पापा घेऊ शकतात !
शीळ घालीत माणंस अजून गाऊ शकतात,
हातात हात गुंफून अजून जाऊ शकतात !
कवी – मंगेश पाडगावकर
mangesh padgaonkar marathi poem |
खरं गाणं
पाखरांना ठाऊक असतं :
बाजारात गळा विकून
आपलं खरं गाणं कधी गाता येत नाही ;
सोन्याच्या पिंजऱ्याला
पंख विकून
आभाळाच्या जवळ कधी जाता येत नाही !
कवी – मंगेश पाडगावकर
होय्योचं गाणं
होय्यो ! होय्यो ! होय्यो !
‘ य ‘ यातला शबल आहे ?
चांगला घट्ट डबल आहे !!
प्रश्न तुमच्या मनातला
कळतो आहे !
माझा रोख त्याच्याकडेच
वळतो आहे !
‘ होय्यो ‘ हा कसला मंत्र असेल ?
किंवा गूढ साधनेचं तंत्र असेल ?
शब्दांच्या अलिकडचं काही असेलं ?
शब्दांच्या पलिकडचं काही असेलं ?
प्रश्न तुमचा अधिक अधिक
खोल जाईल
आणि शेवटी चक्कर येऊन
तोल जाईल !!
बायबल शोधा, कुराण शोधा,
गीता किंवा पुराण शोधा,
होय्यो कुठे मिळणार नाही !
किती जरी शोधलंत तरी कळणार नाही !!
जितके अर्थ शोधीत बसाल,
तितके तुम्ही अधिक फसाल !
होय्यो ! होय्यो !
होय्यो ! होय्यो !
विद्वानांच्या सभेला
एकदा मला जावं लागलं,
न पचणार ज्ञान तिथे
आणि मला खावं लागलं !!
विद्वानांचं एक लक्षण ठाऊक आहे ?
विद्वान कधी दुसऱ्याचं ऐकत नसतो,
विद्वान फक्त न थांबता बोलत असतो !!
खूप होते तिथे विद्वान,
एकापेक्षा एक महान !
बोलत होते, बोलत होते, बोलत होते !
न थांबता तोंड सारखं खोलत होते !!
काय झालं एकदम मला कुणास ठाऊक !
मी सभेत ताडकन उभा झालो,
मोठ्याने ओरडलो :
” होय्यो ! होय्यो ! “
होय्यो होय्यो करीतच बाहेर पडलो !
अंधार पडू लागला होता,
छानपैकी वारा होता ;
फुललेल्या मोगऱ्यासारखा
एक सुंदर तारा होता !
वाऱ्याला मी म्हणालो : होय्यो !
ताऱ्याला मी म्हणालो : होय्यो !
होय्यो ! होय्यो ! होय्यो !
कवी – मंगेश पाडगावकर
एकटं असावसं वाटतं
कधी कधी जवळ कुणी नसावंस वाटतं,
आपलं आपण अगदी एकटं असावसं वाटतं !
अवती भवती रान सगळं
मुकं मुकं असतं,
वाट दिसू नये इतकं
धुकं धुकं असतं !
झाडाखाली डोळे मिटून बसावंसं वाटतं,
कधी कधी जवळ कुणी नसावंस वाटतं,
आपलं आपण अगदी एकटं असावसं वाटतं !
येते येते… हूल देते :
सर येत नाही,
घेते घेते म्हणते तरी
जवळ घेत नाही !
अशा वेळी खोटं खोटं रुसावसं वाटतं,
कधी कधी जवळ कुणी नसावंस वाटतं,
आपलं आपण अगदी एकटं असावसं वाटतं !
कुठे जाते कुणास ठाऊक
वाट उंच-सखल,
त्यात पुन्हा सगळीकडे
निसरडीचा चिखल…
पाय घसरून आदळल्यावर हसावंसं वाटतं,
कधी कधी जवळ कुणी नसावंस वाटतं,
आपलं आपण अगदी एकटं असावसं वाटतं !
पाखरं जरी दिसली नाहीत
ऐकू येतात गाणी,
आभाळ कुठलं कळत नाही
इतकं निवळं पाणी !
आपल्या डोळयांत आपलं रूप दिसावंसं वाटतं,
कधी कधी जवळ कुणी नसावंस वाटतं,
आपलं आपण अगदी एकटं असावसं वाटतं !
ओळीमागून गाण्याच्या
थरारत जावं,
आभाळातून रंगांच्या
भरारत जावं !
सुरांच्या रानात भुलून फसावंसंं वाटतं,
कधी कधी जवळ कुणी नसावंस वाटतं,
आपलं आपण अगदी एकटं असावसं वाटतं !
कवी – मंगेश पाडगावकर