Mangesh Padgaonkar Kavita on Ayushya | Ayushya Kavita
Mangesh Padgaonkar Kavita on ayushya
कवितेबद्दल-
हे गाणं मी तुझ्याकडून शिकलो
हे गाणं मी तुझ्याकडून शिकलो !
आपलं जे असतं
ते आपलं असतं,
आपलं जे नसतं
ते आपलं नसतं !
हसतं डोळे पुसून
आतून फळासारखा पिकलो ;
हे गाणं मी तुझ्याकडून शिकलो !
आलेला मोहर
कधी जळून जातो,
फुलांचा बहर
कधी गळून जातो !
पुन्हा प्रवास सुरु केला
चालून जरी थकलो ;
हे गाणं मी तुझ्याकडून शिकलो !
कधी आपलं गावसुध्दा
आपलं नसतं,
कधी आपलं नावसुध्दा
आपलं नसतं !
अशा परक्या प्रदेशात
वाट नाही चुकलो ;
हे गाणं मी तुझ्याकडून शिकलो !
पिंजऱ्यात कोंडून
पाखरं आपली होत नाहीत,
हात बांधून
हात गुंफले जात नाहीत !
हे मला कळलं तेव्हा
हरुनसुध्दा जिंकलो ;
हे गाणं मी तुझ्याकडून शिकलो !
झाड मुकं दिसलं तरी
गात असतं,
न दिसणाऱ्या पावसात
मन न्हात असतं !
काळोखावर चांदण्याची
वेल होऊन झुकलो ;
हे गाणं मी तुझ्याकडून शिकलो !
– मंगेश पाडगावकर
Mangesh Padgaonkar Kavita on ayushya |
शहाणपणाचं गाणं
माणसाने शहाण्यासारखं वागावं,
आणि मग जगात आनंदाने जगावं !
वाट इथली बिकट असते
हे काय मला ठाऊक नाही ?
पावलोपावली कटकट असते
हे काय मला ठाऊक नाही ?
ठाऊक आहे म्हणून तर
लागतं हे सागावं :
माणसाने शहाण्यासारखं वागावं,
आणि मग जगात आनंदाने जगावं !
कुठेतरी व्हिस्की झोकून आपण घरी जाणार !
प्रश्न आला : आता घरी तोंड कसं देणार ?
अगदी सोपं आहे उत्तर
आणि तितकंच सरळ उत्तर !
जाताना वाटेत एक
गजरा घेऊन घरी जायचं ;
दार उघडलं : बोलू नये :
भारावून बघत रहायचं !
भारावलेल्या अशा नजरा,
बोलायचं काम करील गजरा !
प्रश्न सुटला !
बिनदिक्कत गुणगुणत आत जावं !
माणसाने शहाण्यासारखं वागावं,
आणि मग जगात आनंदाने जगावं !
आपण असतो रस्तावर,
चालत असतो, मजेत, थांबून ;
नवी कोरी एक मोटार
येताना दिसते लांबून !
मोटार चक्क जवळ उभी रहाते !
चालवणारी सुंदर बाई
आपल्याकडे भारावून पहाते !
आपला श्वास एकदम अडतो,
डोक्यामध्ये प्रकाश पडतो !
ही तर होती कॉलेजात आपल्या वर्गात !
गेले ते दिवस
जेव्हा सुखाच्या होतो स्वर्गात ! !
ती खाली उतरणार !
आपण कसे ( अंतर्बाह्य ) फुलून येणार ! !
ती म्हणते : “ बसत नाही माझा विश्वास !”
त्या क्षणी आपण घ्यायचा दीर्घ श्वास ! !
( तिला ऐकू जाईल या बेताने !)
ती म्हणते : “ युगायुगांनी आपण भेटलो !”
अशा वेळी मुळीच नाही दाखवायचं-
आपण आहोत आतून पेटलो !!
नुसतं हसून म्हणायचं,
“चहा घ्यायला चलायचं!”
रुबाबाला ( अर्थात तिच्या ) शोभून दिसेल
महागडं हॉटेल असं समोर असेल !!
मागवायचा शामी कबाब,
( मनात म्हणायचं : गेल्या जन्मी होतो नबाब !)
मनात उधळीत फुलपाखरं,
चाखीत चाखीत चहा प्यायचा :
बिल आठवून मुळीसुध्दा
घाम नाही फुटू घ्यायचा !!
खाणंपिणं, गप्पागोष्टी मजेत होणार,
अर्थातच, निरोप घ्यायची वेळ येणार !
ती चटकन पर्स आपली उघडणार,
“प्लीज, मी बिल देते” असं म्हणणार!!
प्रश्न आला : अशा वेळी काय करावं ?
( जगावं की मरावं )
या प्रश्नाचं उत्तर अगदी सरळ सोपं :
तिला बिल भरू द्यावं !!
कोमल कोमल धागे कोणी निर्दयपणे तोडील काय ?
मला सांगा, मैत्रिणीचं मन कोणी मोडील काय ?
आयुष्य ही बासरी असते :
जवळ घेता आली पीहिजे ;
आपलेच ओठ, आपलेच श्वास :
सुरात लावता आली पाहिजे !
गुणगुणत गुणगुणत तरंगत घरी यावं !
माणसाने शहाण्यासारखं वागावं,
आणि मग जगात आनंदाने जगावं !
– मंगेश पाडगावकर
Mangesh Padgaonkar Kavita on ayushya |
आपलं गाणं आपण गावं
फिदिफिदि हसतील ते ?
हसू देत की !
बोट मोडीत बसतील ते ?
बसू देत की !
आपणं का शरमून जायचं ?
कशासाठी वरमून जायचं ?
तिच्या हातात हात गुंफून आपण जावं,
आपलं गाणं आपल्यासाठी आपण गावं !
दुस्वासाने जळतील ते ?
जळू देत की !
कुजकं दळण दळतील ते ?
दळू देत की !
आपण कां दबून जायचं ?
आयुष्याला उबून जायचं ?
फूल घ्यावं तसं तिला जवळ घ्यावं,
आपलं गाणं आपल्यासाठी आपण गावं !
खोट खोट म्हणतील ते ?
म्हणू देत की !
पोट दुखून कण्हतील ते ?
कण्हू देत की !
आपण कां रडत जायचं ?
काळोखात बुडत जायचं ?
डोळ्यांनी डोळ्यांतल चांदणं प्यावं,
आपलं गाणं आपल्यासाठी आपण गावं !
शाप देत जातील ते ?
जाऊ देत की !
दात ओठ खातील ते ?
खाऊ देत की !
आपण का भिऊन जायचं ?
निराशा पिऊन जायचं ?
ओठ जुळवून ओठांचं देणं द्यावं,
आपलं गाणं आपल्यासाठी आपण गावं !
– मंगेश पाडगावकर