Mangesh Padgaonkar Kavita on Ayushya | Ayushya Kavita

Mangesh Padgaonkar Kavita on Ayushya | Ayushya Kavita

 
 

मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेल्या कविता | Mangesh Padgaonkar Kavita ayushya


Mangesh Padgaonkar Kavita on ayushya

 
 
 
 
 

कवितेबद्दल-

 
 
मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेल्या कविता या ब्लॉग मध्ये देण्यात आल्या आहेत.
 
मंगेश पाडगावकर यांच्या बोलगाणी, तसेच कविता माणसांच्या माणसांसाठी या पुस्तकांमधुन घेण्यात आल्या आहेत. 
 
या सर्व कविता मंगेश पाडगावकर यांच्या आहेत. मंगेश पाडगावकर यांच्या कविता माणसाला जगायला शिकवतात.
 
 
 
हे गाणं मी तुझ्याकडून शिकलो 
शहाणपणाचं गाणं
आपलं गाणं आपण गावं
 
 
 
 
 
 

हे गाणं मी तुझ्याकडून शिकलो 

हे गाणं मी तुझ्याकडून शिकलो !

आपलं जे असतं

ते आपलं असतं,

आपलं जे नसतं

ते आपलं नसतं !

 

हसतं डोळे पुसून

आतून फळासारखा पिकलो ;

हे गाणं मी तुझ्याकडून शिकलो !

 

आलेला मोहर 

कधी जळून जातो,

फुलांचा बहर

कधी गळून जातो !

 

पुन्हा प्रवास सुरु केला

चालून जरी थकलो ;

हे गाणं मी तुझ्याकडून शिकलो !

 

कधी आपलं गावसुध्दा

आपलं नसतं,

कधी आपलं नावसुध्दा

आपलं नसतं !

 

अशा परक्या प्रदेशात

वाट नाही चुकलो ;

हे गाणं मी तुझ्याकडून शिकलो !

 

पिंजऱ्यात कोंडून

पाखरं आपली होत नाहीत,

हात बांधून

हात गुंफले जात नाहीत !

 

हे मला कळलं तेव्हा

हरुनसुध्दा जिंकलो ;

हे गाणं मी तुझ्याकडून शिकलो !

 

झाड मुकं दिसलं तरी 

गात असतं,

न दिसणाऱ्या पावसात 

मन न्हात असतं !

 

काळोखावर चांदण्याची

वेल होऊन झुकलो ;

हे गाणं मी तुझ्याकडून शिकलो !

 

      – मंगेश पाडगावकर

 

 

 

 

मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेल्या कविता | Mangesh Padgaonkar Kavita ayushya
Mangesh Padgaonkar Kavita on ayushya


 

 

 

शहाणपणाचं गाणं

 

माणसाने शहाण्यासारखं वागावं,

आणि मग जगात आनंदाने जगावं !

 

वाट इथली बिकट असते

हे काय मला ठाऊक नाही ?

पावलोपावली कटकट असते

हे काय मला ठाऊक नाही ?

 

ठाऊक आहे म्हणून तर

लागतं हे सागावं :

माणसाने शहाण्यासारखं वागावं,

आणि मग जगात आनंदाने जगावं !

 

कुठेतरी व्हिस्की झोकून आपण घरी जाणार ! 

प्रश्न आला : आता घरी तोंड कसं देणार ?

 

अगदी सोपं आहे उत्तर 

आणि तितकंच सरळ उत्तर !

 

जाताना वाटेत एक 

गजरा घेऊन घरी जायचं ;

दार उघडलं : बोलू नये :

भारावून बघत रहायचं !

भारावलेल्या अशा नजरा,

बोलायचं काम करील गजरा !

 

प्रश्न सुटला !

बिनदिक्कत गुणगुणत आत जावं !

माणसाने शहाण्यासारखं वागावं,

आणि मग जगात आनंदाने जगावं !

 

आपण असतो रस्तावर,

चालत असतो, मजेत, थांबून ;

नवी कोरी एक मोटार 

येताना दिसते लांबून !

 

मोटार चक्क जवळ उभी रहाते !

चालवणारी सुंदर बाई

आपल्याकडे भारावून पहाते !

 

आपला श्वास एकदम अडतो,

डोक्यामध्ये प्रकाश पडतो !

ही तर होती कॉलेजात आपल्या वर्गात !

गेले ते दिवस

जेव्हा सुखाच्या होतो स्वर्गात ! !

 

ती खाली उतरणार !

आपण कसे ( अंतर्बाह्य ) फुलून येणार ! !

 

ती म्हणते : “ बसत नाही माझा विश्वास !” 

त्या क्षणी आपण घ्यायचा दीर्घ श्वास ! !

( तिला ऐकू जाईल या बेताने !)

 

ती म्हणते : “ युगायुगांनी आपण भेटलो !”

अशा वेळी मुळीच नाही दाखवायचं-

आपण आहोत आतून पेटलो !! 

 

नुसतं हसून म्हणायचं,

“चहा घ्यायला चलायचं!”

 

रुबाबाला ( अर्थात तिच्या ) शोभून दिसेल

महागडं हॉटेल असं समोर असेल !!

मागवायचा शामी कबाब,

( मनात म्हणायचं : गेल्या जन्मी होतो नबाब !)

मनात उधळीत फुलपाखरं,

चाखीत चाखीत चहा प्यायचा :

बिल आठवून मुळीसुध्दा 

घाम नाही फुटू घ्यायचा  !!

 

खाणंपिणं, गप्पागोष्टी मजेत होणार,

अर्थातच, निरोप घ्यायची वेळ येणार !

ती चटकन पर्स आपली उघडणार,

“प्लीज, मी बिल देते” असं म्हणणार!!

 

प्रश्न आला : अशा वेळी काय करावं ?

( जगावं की मरावं )

या प्रश्नाचं उत्तर अगदी सरळ सोपं :

तिला बिल भरू द्यावं !!

कोमल कोमल धागे कोणी निर्दयपणे तोडील काय ?

मला सांगा, मैत्रिणीचं मन कोणी मोडील काय ?

 

आयुष्य ही बासरी असते :

जवळ घेता आली पीहिजे ;

आपलेच ओठ, आपलेच श्वास :

सुरात लावता आली पाहिजे !

 

गुणगुणत गुणगुणत तरंगत घरी यावं !

माणसाने शहाण्यासारखं वागावं,

आणि मग जगात आनंदाने जगावं !

 

      – मंगेश पाडगावकर

 
 
 
मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेल्या कविता | Mangesh Padgaonkar Kavita ayushya
Mangesh Padgaonkar Kavita on ayushya


आपलं गाणं आपण गावं

 

फिदिफिदि हसतील ते ? 

हसू देत की ! 

बोट मोडीत बसतील ते ? 

बसू देत की ! 

 

आपणं का शरमून जायचं ? 

कशासाठी वरमून जायचं ? 

 

तिच्या हातात हात गुंफून आपण जावं,

आपलं गाणं आपल्यासाठी आपण गावं ! 

 

दुस्वासाने जळतील ते  ? 

जळू देत की  ! 

कुजकं दळण दळतील ते  ? 

दळू देत की  ! 

 

आपण कां दबून जायचं  ? 

आयुष्याला उबून जायचं  ? 

 

फूल घ्यावं तसं तिला जवळ घ्यावं,

आपलं गाणं आपल्यासाठी आपण गावं  ! 

 

खोट खोट म्हणतील ते  ? 

म्हणू देत की  ! 

पोट दुखून कण्हतील ते ? 

कण्हू देत की  ! 

 

आपण कां रडत जायचं  ? 

काळोखात बुडत जायचं  ? 

 

डोळ्यांनी डोळ्यांतल चांदणं प्यावं,

आपलं गाणं आपल्यासाठी आपण गावं  ! 

 

शाप देत जातील ते  ? 

जाऊ देत की  ! 

दात ओठ खातील ते  ? 

खाऊ देत की  ! 

 

आपण का भिऊन जायचं  ? 

निराशा पिऊन जायचं  ? 

 

ओठ जुळवून ओठांचं देणं द्यावं, 

आपलं गाणं आपल्यासाठी आपण गावं  ! 

 

      – मंगेश पाडगावकर

 
 
 
 
 

***अजून कविता वाचण्यासाठी अवश्य भेट द्या ***

 
 
 
 
 
 
 
 
 
 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top