Mangesh Padgaonkar Marathi Kavita | Padgaonkar Kavita
mangesh padgaonkar marathi poem |
कवितेबद्दल-
मंगेश पाडगावकर यांनी लिहीलेल्या कविता या ब्लॉग मध्ये देण्यात आल्या आहेत.
मंगेश पाडगावकर यांच्या बोलगाणी, तसेच कविता माणसांच्या माणसांसाठी या पुस्तकांमधुन घेण्यात आल्या आहेत.
या सर्व कविता मंगेश पाडगावकर यांनी लिहीलेल्या आहेत. मंगेश पाडगावकर यांनी लिहीलेल्या कविता खास तुमच्यासाठी…
मराठी कविता – गाणं कागदावरचं आणि आपलं
मराठी कविता – फुलं, पक्षी, मी, तू
मराठी कविता – आता काही नाही
मराठी कविता – अजून एक सूर आहे
मराठी कविता – इतक्या दुरुन आलात तर
गाणं कागदावरचं आणि आपलं
कोऱ्या कोऱ्या कागदावर
असलं जरी छापलं,
ओठांवर आल्याखेरीज
गाणं नसतं आपलं !
ती मनात झुरते आहे :
तुम्ही पहात बसणार !
कल्पनेतल्या पावसातच
नुसते नहात बसणार !!
मला सांगा व्हायचं कसं ?
मुक्कामाला जायचं कसं ?
घट्ट जवळ घेतल्याखेरीज
माणूस नसतं आपलं
कोऱ्या कोऱ्या कागदावर
असलं जरी छापलं,
ओठांवर आल्याखेरीज
गाणं नसतं आपलं !
शब्द शब्द रिते शब्द
त्यांचं काय करणार ?
तळफुटक्या माठामधे
पाणी कसं भरणार ?
मला सांगा व्हायचं कसं ?
मुक्कामाला जायचं कसं ?
आपण ओठ लावल्याखेरीज
पाणी नसतं आपलं !
कोऱ्या कोऱ्या कागदावर
असलं जरी छापलं,
ओठांवर आल्याखेरीज
गाणं नसतं आपलं !
करुन करुन हिशोब धूर्त
खूप काही मिळेल,
पण फूल कां फुलतं
हे कसं कळेल ?
मला सांगा व्हायचं कसं ?
मुक्कामाला जायचं कसं ?
फूलपाखरु झाल्याखेरीज
फूल नसतं आपलं !
कोऱ्या कोऱ्या कागदावर
असलं जरी छापलं,
ओठांवर आल्याखेरीज
गाणं नसतं आपलं !
मातीमधल्या बीजाला
एकच अर्थ कळतो :
कोंब फुटून आल्यावरच
हिरवा मोक्ष मिळतो !
मला सांगा व्हायचं कसं ?
मुक्कामाला जायचं कसं ?
आतून आतून भिजल्याखेरीज
रुजणं नसतं आपलं !
कोऱ्या कोऱ्या कागदावर
असलं जरी छापलं,
ओठांवर आल्याखेरीज
गाणं नसतं आपलं !
कवी – मंगेश पाडगावकर
फुलं, पक्षी, मी, तू
फुलं तर मी
जन्मापासून बघत आलो !
त्यांचे रंग,
त्यांचे गंध,
वाऱ्यावर झुलणारे
त्यांचे छंद…
फुलं तर मी
जन्मापासून बघत आलो !
अशीच एकदा अचानक
तू फुलं घेऊन आलीस :
न बोलता, नुसतीत हसून
मला फुलं देऊन गेलीस !
तेव्हापासून फुलं मला
नव्याने दिसू लागली,
सगळी फुलं माझी होऊन
माझ्याशी हसू लागली !
आता मला तुझ्यासाठी
हवं असतं प्रत्येक फूल ;
तेव्हाच्या त्या क्षणासारखं
नवं असतं प्रत्येक फूल !
फुल कधी अशीसुध्दा
कळू लागतात !
आतल्या आतल्या जिवाशी
जुळू लागतात !
पक्षी तर मी
जन्मापासून बघत आलो,
त्यांची गाणी ऐकत आलो !
आभाळातून
भरारताना,
रंगांनी
थरारताना…
पक्षी तर मी
जन्मापासून बघत आलो,
त्यांची गाणी ऐकत आलो !
त्या दिवशी हळुवार संध्याकाळी
माझ्या हातात
तुझा लाजरा हात होता ;
हिरव्या गर्द झाडीतून
अनोळखी पक्षी कोणी गात होता !
आता मला प्रत्येक पक्षी
तुझ्यासाठी हवा असतो ;
तुझ्या पहिल्या स्पर्शासारखा
प्रत्येक पक्षी नवा असतो !
पक्षी कधी असेसुध्दा
कळू लागतात !
आतल्या आतल्या जिवाशी
गाणं होऊन जुळू लागतात !
कवी – मंगेश पाडगावकर
mangesh padgaonkar marathi poem |