Mangesh Padgaonkar Prem Kavita Sangraha
Mangesh Padgaonkar prem kavita |
कवितेबद्दल-
मंगेश पाडगावकर बोलगाणी तसेच मंगेश पाडगावकर यांच्या प्रेम कविता या ब्लॉग मध्ये देण्यात आल्या आहेत.
मंगेश पाडगावकर यांच्या बोलगाणी, तसेच कविता माणसांच्या माणसांसाठी या पुस्तकांमधुन घेण्यात आल्या आहेत.
या सर्व कविता मंगेश पाडगावकर यांच्या आहेत.
तिने लाजून होय म्हटलं
नुक्तंच लग्न झालेली
तिथेही तुझा चेहरा
तू प्रेम केलंस म्हणून
तिने लाजून होय म्हटलं
मी तिला विचारलं, तिने लाजून होय म्हटलं :
सोनेरी गिरक्या घेत मनात गाणं नाचत सुटलं !
काय म्हणालात ? यात विशेष काय घडलं ?
त्यालाच कळेल ज्याचं असं मन जडलं !
तुमचं लग्न ठरवून झालं ?
कोवळेपण हरवून झालं ?
देणार काय ?
घेणार काय ?
हुंडा किती ?
बिंडा किती ?
काड्या किती ?
साडया किती ?
याचा मान,
त्याचं पान,
सगळा मामला रोख होता,
व्यवहार भलताच चोख होता !
तुम्हांला हे सांगून तरी कळणार कसं ?
असलं गाणं तुमच्याकडे वळणार कसं ?
पण ते जाऊ द्या,
माझं गाणं गाऊ द्या :
मी तिला विचारलं, तिने लाजून होय म्हटलं :
सोनेरी गिरक्या घेत मनात गाणं नाचत सुटलं !
त्या धुंदीत, त्या नशेत
प्रत्येक क्षण जागवला ;
इराण्याच्या हॉटेलात
चहासोबत मस्कापाव मागवला !
तीसुद्धा ऐपत नव्हती,
असली चेन झेपत नव्हती !
देवच तेव्हा असे वाली,
खिशात पाकीट खाली !
त्या दिवशी रस्ताने
सिंहासारखा होतो हिंडत,
पोलीससुद्धा माझ्याकडे
आदरपूर्वक होते बघत !
जीव असा तरंगतो तेव्हा भय असणार कुठलं ?
मी तिला विचारलं, तिने लाजून होय म्हटलं :
सोनेरी गिरक्या घेत मनात गाणं नाचत सुटलं !
एक दिवस चंद्र, फुलं, तारे, वारे
सगळं मनात साठवलं,
थरथरणाऱ्या हातांनी
तिला पत्र पाठवलं !
आधीच माझं अक्षर कापरं,
त्या दिवशी अधिकच कापलं !
रक्ताचं तर सोडाच राव,
हातामधे पेनसुद्धा होतं तापलं !
पेटीत पत्र टाकल्यानंतर आठवलं :
पाकिटावर तिकीटच नव्हतं लावलं !
सांगायचा मुख्य मुद्दा :
पत्र तिला मिळालं तरीसुद्धा !
नक्की सांगतो पोस्टमन तो
प्रेमात पडला असला पाहिजे !
माझ्यासारखाच त्याचासुद्धा कुठेतरी
जीव जडला असला पाहिजे !
नशिबाच्या भिंतीतून हिरवंगार पान फुटलं !
मी तिला विचारलं, तिने लाजून होय म्हटलं :
सोनेरी गिरक्या घेत मनात गाणं नाचत सुटलं !
पुढे मग ( तिच्याशीच ) लगीन झालं,
यथाकाल मुलं झाली,
संगोपन बिंगोपण करून बिरून शिकवली,
मी तिच्या प्रेमाखातर
नोकरीसुद्धा टिकवली !
यात फरक काय पडणार !
घराघरात असंच घडणार !
तसा प्रत्येक नेक असतो !
फरक मात्र एक असतो :
मी तिला विचारलं, तिने लाजून होय म्हटलं :
सोनेरी गिरक्या घेत मनात गाणं नाचत सुटलं !
– मंगेश पाडगावकर
Mangesh Padgaonkar prem kavita |
नुक्तंच लग्न झालेली
तिचं अगदी नुक्तंच लग्न झालेलं.
श्रावणातल्या स्वच्छ न्हाल्या संध्याकाळी
ओलेत्या झाडीतून
ऐकू यावं पक्ष्याचं गाणं जसं
तसं तिचं अंगभूत ताजेपण.
नक्षत्रांची मोहरलेलं एक आभाळ झुकलेले
अलीकडे फक्त तिच्याच घराच्या कौलारावर ;
पहाटेच्या आधी तिची दवासारखी कोवळी जाग ;
केळीच्या ओथंबलेल्या बागेतलं निळं चांदणं
तसं तिचं स्वत:च्याच नादात असणं.
तिचे डोळे स्वत:ला विसरून जग पाहणारे.
हातांतल्या बांगड्या तिच्या हिरवंगार किणकिणताना
ओठ तिचे खुप काही सांगू सांगू आलेले…
पण तरी पिकलेल्या फळासारखे काहीच न बोलणारे.
तिला वाटतंय : झुळसुळणारा मधाचा कोवळा झरा
खोल खोल काळजात तिला नव्यानेच सापडलाय :
खरं तर, तो अगदी आधीपासून तिथेच होता !
– मंगेश पाडगावकर
तिथेही तुझा चेहरा
रात्र अशी सुनसान, उदासी घेउनिया पाउस आला,
सांग कुणाचे व्याकूळ डोळे घेउनिया पाउस आला ?
तुझ्या घरावर, कौलारावर असेल बरसत या वेळी,
हाक तुझी भिजलेली ओली घेउनिया पाउस आला.
पुस्तकात मिटूनी सुकलेले फूल कुणितरी ठेवियले
तशा स्मृती मिटलेल्या हळव्या घेउनिया पाउस आला.
घेतलात तू निरोप माझा तेव्हा मिटल्या डोळयांनी,
मौन तुझे ओथंबून भरले घेउनिया पाउस आला.
उंबरठ्याने फुलांसारखे थेब झेलले ओठांनी,
तू म्हटलेले माझे गाणे घेउनिया पाउस आला.
खोल खोल मी बुडी घेतली या अंधारी एकाकी,
तरी तिथेही तुझा चेहरा घेउनिया पाउस आला.
– मंगेश पाडगावकर
तू प्रेम केलंस म्हणून
तिचं प्रेम लाभलं नाही ? रडू नको,
जीव द्यायला पाण्यामध्ये बुडू नको !
आपण प्रेम केलं म्हणजे
काय केलं ?
फुलून आलो !
कुणासाठी आपण जीव टाकला
म्हणजे काय केलं ?
फुलून आलो!
फुलणाऱ्याला
जगावंसं वाटलं पाहिजे !
फुलणारं प्रत्येक फूल
बघावंसं वाटलं पाहिजे !
रोग लागल्या झाडासारखा झडू नको !
तिचं प्रेम लाभलं नाही ? रडू नको,
जीव द्यायला पाण्यामध्ये बुडू नको !
फांदीने जेव्हा बहर धरला होता,
रंगांनी जीव सगळा भरला होता !
कशासाठी नाकारायचा आपलाच बहर
आणि जगणं करायचं काळं जहर ?
खोटे खोटे मुखवटे, त्यांच्यामागे दडून नको !
तिचं प्रेम लाभलं नाही ? रडू नको,
जीव द्यायला पाण्यामध्ये बुडू नको !
सगळं रान
पाचूंनी वाकलं आहे ;
हिरवं तळं
कमळांनी झाकलं आहे ;
मातीच्या मौनाला
इवलं इवलं फूल आलं ;
आकाशाचं
निळंनिळं देऊळ झालं !
रानं कां हिरवी होतात ?
कमळं का फुलून येतात ?
मौनाचं कां फुल होतं ?
आकाश कसं देऊ होतं ?
या प्रश्नाचं उत्तर आहे एकच धून :
” तू प्रेम केलंस म्हणून,
तू प्रेम केलंस म्हणून ! “
तू प्रेम केलंस म्हणून
जगात या जगावंसं वाटतं मला,
तू प्रेम केलंस म्हणून
माझं गाणं गावं असं वाटतं मला,
तुझं गाणं तूच असं खुडू नको,
तिचं प्रेम लाभलं नाही ? रडू नको,
जीव द्यायला पाण्यामध्ये बुडू नको !
– मंगेश पाडगावकर
'कोमल जगताप' मनःपूर्वक आभार !