Mangesh Padgaonkar Writting Marathi Kavita’s | Vidushak

Mangesh Padgaonkar Writting Marathi Kavita’s | Vidushak

 
 
मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेल्या कविता | vidushak by mangesh padgaonkar
vidushak by mangesh padgaonkar


 
 

कवितेबद्दल-

 
 
विदूषकाचं आत्मकथन ही कविता मंगेश पाडगावकर यांनी लिहीलेली आहे. मंगेश पाडगावकर यांच्या बोलगाणी या पुस्तकांमधुन ही कविता घेण्यात आली आहे. 
 
या कवितेमध्ये विदूषकाचं आत्मकथन मांडण्यात आले आहे. 
 
 
                             

विदूषकाचं आत्मकथन – मंगेश पाडगावकर

 
 
 
विदूषकी हा माझा धंदा आहे ; 
रूपया अगदी चोख आणि बंदा आहे  ! 
 
‘ धंदा ‘ हा शब्द काही
तुम्हांला रूचला नाही ;
तुम्हांला वाटत असेल
मला दुसरा सुचला नाही  ! 
 
‘ व्यवसाय ‘, होय, ‘ व्यवसाय ‘
हाच शब्द तुम्हांला बरा वाटतो ;
प्रतिष्ठेच्या दृष्टीने खरा वाटतो  ! 
 
संस्कृत कपडे घातलेला
सुसंस्कृत माणूस वाटतो ‘ व्यवसाय ‘;
( इथे माझा निरूपाय  !) 
 
माझं आणि संस्कृतचं
मुळातच वाकडं होतं ;
देवाला मी घातलेलं साकडं होतं  !! 
 
संस्कृत या शब्दाच्या उच्चारातच
मुळात मी मार खायचो  :
नटबोल्टस्र्कू  यांतल्या स्र्कूसारखा
संस्कृतमधला ‘ स्र्कू ‘ मी उच्चारायचो  !! 
 
संस्कृतच्या तासालाच
विदूषकी प्रथम शिकलो ;
तेव्हापासून
आजपर्यंत
तेवढ्यावरच मी टिकलो  ! 
 
विदूषकी हा माझा धंदा आहे ; 
रूपया अगदी चोख आणि बंदा आहे  ! 
 
शरीराची करु शकतो वेलांटी
अशी माझी वळणदार कोलांटी  ! 
फिदी फिदी हसतो मी
थपकल मारून बसतो मी  ! 
 
पोळीसारखी मी माझी टोपी खातो  ;
जागा असून चक्क गाढ झोपी जातो  ! 
डोक्यापेक्षा श्रेष्ठ मानतो मी तंगडी  :
सबबीसारखीच चालते ती असून लंगडी  ! 
 
विचार आणि उवा यांत
मला एक साम्य दिसतं :
दोघांचंही रहाण्याचं
डोकं हेच ठिकाण असतं  ! 
 
माझी बायको सारखी डोकं खाजवते :
तिची थोरवी त्यामुळेच जाणत आलो, 
मी तिला विचारवंत मानत आलो  ! 
 
शेजारी रहाणारा तत्त्वचिंतक प्रोफेसर
तोही आपलं डोकं सारखं खाजवत असतो  ;
डोक्यामध्ये त्याच्या उवा असूनसुद्धा
‘ विचार करतो ‘ अशी टिमकी वाजवत असतो  ! 
 
माझं हे म्हणणं माझ्या बायकोला
पूर्णपणे खरं वाटतं  ! 
मी तिला विचारवंत म्हटलं की, 
तिला फार बरं वाटतं  !! 
 
मी मात्र डोक्याचं
स्तोम कधी माजवत नाही  ! 
मी कधी चुकूनसुद्धा
माझं डोकं खाजवत नाही  !! 
 
विदूषकी हा माझा धंदा आहे ; 
रूपया अगदी चोख आणि बंदा आहे  ! 
 
सर्कस असो, नाटक असो, 
सिनेमाच्या स्टुडिओचं फाटक असो  :
मला आत जावंच लागतं, 
कंत्राटांना मला शोधत यावंच लागतं  ! 
 
लफंग्याला धंदा म्हणून
फसवावंच लागतं ;
विदूषकाला धंदा म्हणून
हसवावंच लागतं  ! 
 
नसली जरी माझी इच्छा, 
धंदा माझा सोडत नाही माझा पिच्छा  ! 
असा हा ताप आहे, 
पूर्वजन्मी मिळालेला शाप आहे  ! 
 
चारचौघांत घरात जरी बसलो मी  :
नवे किस्से, नव्या कोट्या पेचत असतो, 
माझ्याकडे सतत लक्ष खेचत असतो  ! 
 
लोकांनाही माझी चटक लागली आहे  :
मी येताच इतर विषय वगळतात, 
माझे किस्से, 
माझ्या कोट्या
सुपारीच्या खांडांसारख्या चखळतात  !! 
 
विदूषकी हा माझा धंदा आहे ; 
रूपया अगदी चोख आणि बंदा आहे  ! 
 
हमखास रंगत जाणाऱ्या
माझ्या एका खेळामध्ये
माझं एक कुत्रं होतं ;
तसं मुळात भित्र होतं  ! 
 
शिकवून शिकवून नीट झालं, 
भलतंच सभाधीट झालं  ! 
स्टेजवर चलाखपणे बागडायचं, 
लोकांना त्याचं सगळं आवडायचं  !! 
 
एकट्यानेच मी जर 
स्टेजवर प्रवेश केला, 
लोक चिडून गाली द्यायचे ;
मागून कुत्र आलं की
एंट्रीलाच टाळी द्यायचे  !! 
 
‘ डार्लिंग ‘ अशी हाक मी घातली की
लचकत लचकत जवळ यायचं, 
लाजत माझा मुका घ्यायचं  !! 
 
वाद्यांच्या साथीवर
अगदी नेमके अवयव हलवून
नटीसारखं नाचत असे  ! 
स्टेजवरती गाॅगल लावून
व्यामिश्र विश्ववास्तव कोंबलेलं
भंकस काव्य वाचत असे  ! 
पाहून त्याच्या अशा नकला
थक्क होऊन जात असला  !! 
 
भुंकणं किंवा लाळ गाळणं ;
मिठी मारणं किंवा टाळणं ;
निष्ठा दाखवत शेपटी घालणं ;
सगळं त्याला येत असे :
टाळ्यांवर टाळ्या झेलून घेत असे  !! 
 
गुणांनीच या त्याला
जिथे न्यायचं तिथे नेलं  :
विदूषकाचं गुणी कुत्रं
राजकीय पक्षात गेलं  !! 
 
निवडणूकीला उभं झालं
आणि चक्क निवडून आलं ;
हिकमतीने आगे आगे बढत गेलं, 
सत्तेची एकेक पायरी चढत गेलं  !! 
 
सध्या मात्र ग्रहदशा बरी नाही, 
नशिबाची चाल त्याच्या खरी नाही  ! 
भ्रष्टाचार केल्याचं किटाळ येऊन
तोंड त्याचं गप्प आहे ;
आरोपांच्या चिखलामधे
प्रगतीचं चाक त्याच्या ठप्प आहे  ! 
 
नवस करीत सध्या घरात लपून आहे :
मात्र वेळ येईल तेव्हा
मुख्यमंत्री होण्यासाठी टपून आहे  !! 
 
मी केवळ विदूषक  ! 
दुसरं काय करणार  ? 
विदूषकी केल्याशिवाय
पोट कसं भरणार  ? 
 
कुत्रं नसल्यामुळे सध्या
हाऊसफुल्ल होत नाही  ;
पूर्वीइतका अंगावरती
प्रसिद्धीचा झोत नाही  ! 
 
तरीसुद्धा जिद्दीचा मी खंदा आहे ;
विदूषकी हा माझा धंदा आहे ; 
रूपया अगदी चोख आणि बंदा आहे  ! 
 
विदूषक प्रेमातसुद्धा पडत असतो ;
प्रेमापेक्षा पडणंच त्याचं अधिक असतं  !! 
 
पडण्याची ही आपत्ती
माझ्यावर अनेकदा आली आहे, 
बरीच पडझड झाली आहे  !! 
 
प्रेम ही थट्टा नव्हे  ! 
प्रेम हे गंभीरपणे घ्यांव लागतं  ;
भारावलेल्या भावनेने
प्रेमाला सामोरं जावं लागतं  ! 
 
अशा या भावनेच्या भारावण्यात
विदूषकाचं मन कसं रमणारा  ? 
गंभीरपणे प्रेम करणं
स्वभावाला त्याच्या कसं जमणार  ? 
 
थट्टा, चेष्टा, टवाळी
हाच त्याचा आदर असतो  :
विदूषक आदतसे लाचार असतो  !! 
 
प्रेम करता करता मला
भलत्या वेळी, नको तिथे हसू येतं  ! 
असं माझं दैव माझा सूड घेतं  !! 
 
माझी एक प्रेयसी
भारावून एकदा मला म्हणाली  :
” प्रेम ही भाषा आहे श्वासांची, 
प्रेम ही हळुवार गुणगुण आहे  ! “
मी चटकन विचारलं, ” डासांची  ? “
 
मीच माझ्या विनोदाला
मोठयाने खो खो हसलो  ! 
हवा गेल्या फुग्यासारखं
आमचं प्रेम हातात घेऊन नंतर बसलो  !! 
 
तेव्हापासून स्वत:वरच्या
प्रेम करीत असतो मी  ! 
स्वत:लाच मोठमोठ्याने हसतो मी  ! 
हसून हसून थकून माझा भुगा होतो ;
हवा निघून गेलेला
मीच एक फुगा होतो  !! 
 
हसणं आणि हसवणं हा माझा धंदा आहे ; 
रूपया अगदी चोख आणि बंदा आहे  ! 
 
 
 

मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेल्या कविता | vidushak by mangesh padgaonkar
vidushak by mangesh padgaonkar


 
 
 
                          
 
विदूषक असलो तरी
पुस्तकं मी वाचत असतो  ! 
त्यांतले महत्त्वाचे मुद्दे
मनात माझ्या टाचत असतो  !! 
 
एकदा मी वाचलं की
तरण्यामागे बुडणं असतं, 
अगदी तसंच हसण्यामागे
दडलेलं रडणं असतं  !! 
 
मिठाच्या पाण्यामध्ये भिजवलेला रूमाल मी
तेव्हापासून खिशामध्ये ठेवत असतो  :
स्टेजवरून हसताना, हसवताना
मधूनमधून डोळयांना लावत असतो  ! 
 
टीकाकार म्हणतात की
ओठांवर जरी माझ्या हासू आहे, 
तरीसुद्धा डोळ्यांमध्ये करुणचा आसू आहे  !! 
 
आणखी असं वाटलं की
जे कोणी कलावंत
टाळ्यांवर नजर ठेवून असतात
ते फारसे वाढू शकत नाहीत ;
अखेर त्यांच्या कलेचा
फटाका फुसका ठरतो, 
बंदुकीचा बार ते काढू शकत नाहीत  !! 
 
तेव्हापासून टाळ्या पडू लागल्या की
लोकांकडे स्टेजवरून माझी पाठ वळवतो 
टाळ्यांकडे माझी नजर नसते हे
न बोलता तिथेच त्यांना कळवतो  ! 
 
अशा वेळी पार्श्वभाग बघून माझा
लोक मनात भलत्या शंका काढू लागतात ;
लोकांना अनावर हसू येतं, 
टाळ्यांचा पाऊस ते पाडू लागतात  ! 
 
जन्माला आलो तेव्हा
सटवीनेच पहिली टाळी दिली असणार  :
विधिलिखित कोण आणि कसं पुसणार  ? 
 
विदूषकी हा माझा धंदा आहे ;
रूपया अगदी चोख आणि बंदा आहे  ! 
 
लहान होतो तेव्हा मला
काळोखाचं खूप भय वाटायचं ;
बाहेर काळोख पडला की
घरातसुद्धा काळीज माझं फाटायचं  !! 
 
अजूनही वाटतं की
आपण काही केलं तरी
काळोखाला संधी ही मिळणारच  ;
 
काळोखाचा काळा अजगर
मागून येऊन आपल्याला गिळणारच  !! 
 
स्टेजवरच्या प्रकाशात अजूनही
काळोखात आहे असं वाटतं मला  ;
हशा आणि टाळ्या यांच्या जल्लोषात
माझं मरण तिथे येऊन गाठतं मला  ! 
 
स्टेजवरच्या प्रकाशात एकदा माझा
हसता हसता अचानक श्वास अडला  ;
लोक सगळे समोर होते तरीसुद्धा
काळोखाचा अजगर येऊन मला भिडला  !! 
 
तोंडातलं वाक्य माझ्या
आणि अर्ध्यावरच अडलं  ;
वाकडंतिकडं ढुंगण करून
शरीर माझं मरून पडलं  !!
 
माझं वाकडं ढुंगण बघून
प्रेक्षक सगळे मोठ्याने हसत होते ;
टाळ्यांना तर सुमार नव्हता  :
झपाटून गेल्यासारखे दिसत होते  ! 
 
स्टेजवर माझं प्रेत पडलेलं
तरी हसणं सुचतं त्यांना  ? 
विदूषकाच्या मरणालाही
टाळी देणं रूचतं यांना  ? 
 
यांच्यावर मी खूप प्रेम 
केलं होतं, 
आनंदाच्या नंदनवनात
हात धरून मीच यांना
नेलं होतं  !! 
 
वाटलं होतं, माझं मरण
बघून सगळे रडतील हे ;
शोकाच्या समुद्रात
खोल खोल बुडतील हे  !! 
 
हसण्याला तर जोर त्यांच्या चढत होता, 
टाळ्यांचा तर सारखा पाऊस पडत होता  ! 
 
वणव्यासारखा राग माझा भडकला, 
माझा सगळा संयम पार तडकला  ! 
 
मी म्हटलं, यांची गय
जरासुद्धा करणार नाही  ! 
अशा या लोकांसाठी
प्राण गेला तरी मी मरणार नाही  !! 
 
ढुंगण माझं हलवीत हलवीत
मी चक्क उभा झालो, 
टेबलावरती नसलेलं
ग्लास घेऊन हुबेहूब पाणी प्यालो  ! 
 
प्रचंड हशा पिकला
आणि बराच वेळ टिकला  !! 
 
मी माझे कान ओढले, 
त्यानंतर हात जोडले, 
 
आणि म्हटलं, ” लोक हो  ! 
मी पुन्हा पूर्वीसारखा झालो आहे  ! 
तुम्हांला श्रध्दांजली वाहायला
आज इथे आलो आहे  !! 
 
विदूषकीबरोबरच
लाकडंसुद्धा विकण्याचा
माझा छोटा धंदा आहे ;
 
लाकडं आता लागतीलच :
या तुमच्या सेवेसाठी
हजर मी तुमचा गुलाम बंदा आहे  !! “
 
प्रचंड हशा पिकला, 
आणि बराच वेळ टिकला  !! 
 
ढगांचा व्हावा जसा
गडगडाट, 
तसा झाला टाळ्यांचा
कडकडाट  !! 
 
मी ढुंगण सवयीने हलवलं, 
त्याच क्षणी आठवलं :
 
तरण्याच्या मागे एक
बुडणं असतं ;
हसण्याच्या मागे एक रडणं असतं  !! 
 
मिठाच्या पाण्याने भिजवलेला 
रूमाल काढला मी माझ्या खिशातून :
डोळयांना लावताक्षणी
अश्रूच अश्रू ओघळू लागले
गालांवरून आणि माझ्या मिशांतून  !! 
 
असो नसो आपली इच्छा, 
धंदा सोडत नाही पिच्छा  !! 
 
विदूषकी हा माझा धंदा आहे ;
रूपया अगदी चोख आणि बंदा आहे  ! 
 
– मंगेश पाडगावकर
 
 
 
 
 
 

***अजून कविता वाचण्यासाठी अवश्य भेट द्या ***

 
 
 
 
 
 
 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top