Mangesh Padgaonkar Marathi Kavita Vara

Mangesh Padgaonkar Marathi Kavita Vara

 
 
 
 
vara marathi kavita mangesh padgaonkar | marathi kavita vara
Vara Marathi Kavita

कवितेबद्दल   :

 
         मराठी कविता वारा ही कविता मंगेश पाडगांवकर यांच्या कविता माणसांच्या माणसांसाठी या पुस्तकातून घेण्यात आली आहे. मराठी कविता वारा ही कविता मंगेश पाडगांवकर लिखित कविता आहे. या कवितेच्या माध्यमातून मंगेश पाडगांवकर यांनी वाऱ्याच्या विविध छटा अधोरेखित केल्या आहेत. मंगेश पाडगांवकर यांची वारा ही कविता खास  प्रिय वाचकांसाठी… 
 

वारा मराठी कविता

 

पाहिलत कधी वाऱ्याला

गवतावर सुखावून मऊ मऊ लोळताना  ? 
सकाळच्या किरणांचं गितार छेडीत हिंडताना  ? 
गर्द हिरव्या फेसाळणाऱ्या लाटांशी
नेसण सोडून धिंगाणा घालताना  ? 
 
 
बांबूच्या बनातली त्याची सुरेल लाडीगोडी ;
आणि त्याच्या लयीचा अद्भूत हिशोब 
भिरभिर उडत्या पिसाला जेव्हा तो साथ करतो  ! 
कधी कधी त्याचं ते राख फासून निघून जाणं, 
आणि पुन्हा मातीचा ओलाचिंब वास हुंगत परत येण ! 
 
 
पिवळ्या धमक फुलाच्या वेलीला झुकवतोय, 
फुलपाखराला डोळे घालून भुलवतोय, 
झाडांना झिज्या धरून गदागदा हलवतोय, 
माळावर तिरकी मान करून धावतोय, 
शंभोऽ शंभोऽ हाळी देत घळीत घुमतोय , 
वादळ होऊन समुद्रावर धुमशान घालतोय  ! 
 
 
मनातलं सांगायचं होतं जेव्हा अनावर 
तेव्हा वारा काहीसुद्धा बोलत नाही  :
एकटा एकटा जातो रानात, आपल्याच तंद्रीत
नाचू लागतो, नाचू लागतो, नाचू लागतो :
ढग यावा पाण्याने गच्च भरून
तसं ते त्याचं नाचणं 
मनात जे सांगायच असतं त्याने
तुडुंब तुडुंब भरून येतं… 
नाचत रहातो, नाचत रहातो, नाचत रहातो, 
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची लावून नाचतो, 
विदूषकाची टोपी घालून नाचतो, 
बांध फोडणारं दु:ख होऊन नाचतो, 
चिनी बुद्ध हसतो तसं हसत हसत नाचतो, 
त्याचं असणं नाचणं होत, 
त्याचं नाचणं असणं होत,
ओथंबून ओथंबून ओथंबून
सगळ्या अस्तित्वाने नाचतो, 
फुलणाऱ्या फुलाचा देठ होऊन नाचतो, 
गळणाऱ्या फुलाचा देठ होऊन नाचतो, 
वारा मग उरत नाही, 
फक्त नाचणं उरतं  :
नाव रूप ओलांडून फक्त नाचणं उरतं… 
 
मंगेश पाडगांवकर
 
 
                

अजून मराठी कविता वाचा  :

 
 
 
 
 
 
 
 
 
 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top